फेसबुकवरील ओळखीचा गैरफायदा घेत महिलेस अत्याचार करणाऱ्या आरोपीस महाड पोलिसांची अटक


महाड (रेश्मा माने):फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेस जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नराधमास महाड शहर पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाड शहराजवळील नगरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेची फेसबुकवरून मुंबई येथील मकरंद सूर्यकांत चव्हाण (वय 38, मूळ राहणार तेलंगे, ता. महाड) याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत चव्हाण याने त्या महिलेस वारंवार संपर्क साधून त्रास देण्यास सुरुवात केली.

यानंतर आरोपीने सदर महिलेच्या घरी जाऊन तिच्या पती व मुलांना मारहाण केली. तसेच फोटो व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेस जबरदस्ती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पीडित महिलेनं महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीनंतर महाड शहर पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपी मकरंद सूर्यकांत चव्हाण यास अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम 354(1), 354(2), 506, 352, 376(1) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास महाड शहर पोलिस करत आहेत.