ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ – सिद्धी स्वीट दुकानावर तपासाची मागणी


महाड (रेश्मा माने):महाड शहरातील एस.जी. रोडवरील प्रसिद्ध सिद्धी स्वीट या मिठाई दुकानातून दूषित समोसे व मिठाई विक्री केल्याचा आरोप उघडकीस आला आहे. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पत्रकार जुनेद तांबोळी यांच्या घरातील व्यक्तींनी या दुकानातून समोसे खरेदी करून खाल्ल्यानंतर त्यांना उलटी व जुलाबाचा त्रास झाला. याबाबत दुकानदाराकडे जबाब विचारण्यात आला असता, त्याने दुर्लक्षपूर्ण वर्तन करत उलटपक्षी धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची तक्रार महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

पत्रकार तांबोळी यांच्या पत्नी व आई यांनी सिद्धी स्वीट दुकानातील समोसे खाल्ल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचे निदर्शनास आले. तांबोळी यांनी दुकानदाराचे लक्ष वेधले असता, “चुकून झाले असेल” असे गैरजबाबदार उत्तर देण्यात आले. त्यानंतर दुकानदार व त्याच्या सहकाऱ्यांकडून फोनद्वारे धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

ग्रामीण भागातील अनेक नागरिक महाड शहरात मिठाई, समोसे, फास्टफूड खरेदीसाठी येतात. परंतु अनेकदा स्वच्छतेचा अभाव, एक्सपायरी खाद्यपदार्थांची विक्री आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचे प्रकार समोर येतात. मागील वर्षीही महाडमधील एका नामांकित मिठाई व्यवसायिकावर अशाच कारणावरून कारवाई झाली होती.

या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने तपास करून सिद्धी स्वीट तसेच शहरातील इतर मिठाई व फास्टफूड दुकानांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मिठाई विक्रीमुळे अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्यास जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.