रायगड (प्रतिनिधी): रेवदंडा परिसरात लहान मुलांना शाळेतून ये-जा करण्यासाठी वापरली जाणारी एका प्रवासी वाहनाबाबत गंभीर अनियमितता समोर आली आहे. संबंधित वाहनाच्या नंबर प्लेटवर मोठा विसंगती आढळली असून, वाहनाच्या पुढील बाजूस एक नंबर तर मागील बाजूस पूर्णपणे वेगळा नंबर लिहिलेला असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. या वाहनाचे खरे नोंदणी क्रमांक कोणते आहे, वाहनाच्या कागदपत्रांची स्थिती काय आहे, तसेच वाहनाला शालेय वाहतुकीची अधिकृत परवानगी आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दररोज या वाहनातून अनेक लहान मुले प्रवास करत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनधिकृत व संशयास्पद वाहनाचा शालेय वाहतुकीसाठी वापर होणं अत्यंत धोकादायक असून, कोणत्याही क्षणी अपघातासारखी दुर्घटना घडू शकते, अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, हे वाहन अनेक दिवसांपासून असेच संशयास्पद पद्धतीने रस्त्यावर धावत आहे. एवढे सर्व होत असतानाही संबंधित वाहनावरील पोलिसांचे लक्ष न जाणे, ही देखील मोठी बाब असल्याचे नागरिकांचे मत आहे. त्यांनी पोलिस प्रशासनाने तात्काळ या वाहनाची तपासणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे रेवदंडा परिसरात मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली असून पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.









