नागाव-आक्षी परिसरात बिबट्याचा संचार; ११ डिसेंबरला सर्व शाळा व अंगणवाड्या बंद


अलिबाग (प्रतिनिधी): नागाव परिसरात अलीकडे बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाकडून अद्याप परिसर पूर्णपणे सुरक्षित असल्याची अधिकृत खात्री मिळालेली नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अलिबाग तहसीलदार व गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार नागाव व आक्षी ग्रामपंचायतीतील सर्व शाळा आणि अंगणवाडी ११ डिसेंबर २०२५ रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय तात्पुरता असून पुढील आदेश मिळताच त्याची माहिती सर्व संबंधितांना त्वरित देण्यात येईल. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी या निर्णयाची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.अलिबाग नागाव सरपंच हर्षदा मयेकर यांनीही नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगितले आहे.