विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य : नागाव–आक्षी ग्रामपंचायतीतील सर्व शाळा दोन दिवस बंद


अलिबाग(प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मा. तहसीलदार अलिबाग तसेच गटशिक्षण अधिकारी यांच्या निर्देशानुसार नागाव व आक्षी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व शाळा आणि अंगणवाड्या 12 व 13 डिसेंबर 2025 रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिसरातील परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रुप ग्रामपंचायत नागावच्या सरपंच सौ. हर्षदा निखिल मयेकर यांनी दिली.

या दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवार, दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सर्व शाळा व अंगणवाड्या पूर्ववत सुरू होतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच पालकांची गैरसोय टळावी यासाठी संबंधित शैक्षणिक संस्था व ग्रामपंचायत प्रशासन सतत संपर्कात आहे. शाळा सुट्टीच्या काळात परिसरातील आवश्यक दुरुस्ती, स्वच्छता व सुरक्षा उपायांचीही पाहणी होणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या निर्णयाची सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, अशी विनंती ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे. विद्यार्थ्यांचे हित सर्वोच्च मानत घेतलेला हा निर्णय वेळोवेळी प्रशासनाची सजगता दाखवणारा असल्याचे ग्रामस्थांनीही नमूद केले आहे.