अलिबाग नगरपरिषदेवर शेकाप–काँग्रेसची निर्विवाद सत्ता; अक्षयांचा दणदणीत विजय


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया रविवारी सकाळी पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) व काँग्रेसने घवघवीत यश मिळवत नगरपरिषदेवर वर्चस्व प्रस्थापित केले. नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या एकूण १८ जागांपैकी १७ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
नगराध्यक्षपदासाठी शेकापच्या उमेदवार अक्षया यांनी तब्बल ८,९७४ मते मिळवत भाजपच्या उमेदवार तनुजा पेरेकर यांचा दारुण पराभव केला. या निर्णायक विजयामुळे अलिबाग शहराच्या राजकारणात शेकापने आपले वर्चस्व अधिक मजबूत केले आहे.
निवडणूक निकाल जाहीर होताच शेकाप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला. विकासाभिमुख कारभार, स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका आणि जनतेचा विश्वास हे या यशामागील प्रमुख कारण असल्याचे नेत्यांनी सांगितले.