अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत अक्षया नाईक यांचा ऐतिहासिक विजय; शहरात उत्साहाचे वातावरण


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत अक्षया नाईक यांनी ऐतिहासिक विजय मिळवत राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेतले आहे. या विजयामुळे अलिबाग शहरात उत्साहाचे वातावरण असून, नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विजयानंतर अक्षया नाईक यांनी अलिबागकरांचे मनापासून आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अलिबागच्या जनतेने त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जो विश्वास दाखवला, तो कधीही विसरता येणार नाही. हा विजय केवळ माझा नसून, तो अलिबागच्या प्रत्येक मतदाराचा आणि कार्यकर्त्याचा आहे, असे त्यांनी नमूद केले. निवडणूक प्रचारादरम्यान मिळालेल्या प्रेम, पाठिंबा आणि सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
पुढील काळात अलिबागच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नगरपरिषदेमध्ये पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अलिबागच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.