खोपोली (दिनकर भुजबळ): समाजकार्याची समृद्ध परंपरा पुढे नेत सौ. ऐश्वर्या वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका म्हणून खोपोली नगरपरिषदेत यशस्वी पदार्पण करत सार्वजनिक जीवनात नवा आशावादी अध्याय सुरू केला आहे. विवेक पाटील कुटुंबातील सून म्हणून सामाजिक जाणिवा आणि सेवाभावाचे संस्कार लाभलेल्या ऐश्वर्या पाटील यांनी आपल्या या यशामागे पक्षनेतृत्व, निष्ठावान कार्यकर्ते, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच नागरिकांचे सामूहिक योगदान असल्याची नम्र भावना व्यक्त केली आहे.
शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ऐश्वर्या पाटील या बी.ई. (माहिती तंत्रज्ञान) पदवीधर असून सध्या त्या योट्टा डेटा सेंटरमध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून जबाबदारीची भूमिका पार पाडत आहेत. शिक्षणातून मिळालेली तांत्रिक समज, व्यावसायिक क्षेत्रातील शिस्तबद्ध अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्य यांचा सकारात्मक प्रभाव सार्वजनिक कामकाजात निश्चितच दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नगरसेविका म्हणून निवड झाल्यानंतर पुढील पाच वर्षांत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शकता, विश्वास आणि विकास या मूल्यांवर आधारित कार्यपद्धती स्वीकारत खोपोलीच्या प्रगतीसाठी नव्या दृष्टीने, नव्या ऊर्जेने आणि ठोस कृतीतून काम करण्याचा ठाम संकल्प सौ. ऐश्वर्या पाटील यांनी व्यक्त केला आहे.









