अलिबाग पालिकेवर पुन्हा एकदा ‘नाईक’ पर्व नगराध्यक्षा अक्षया नाईक यांचा भावूक पदभार


अलिबाग (प्रतिनिधी): चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज आपण पुन्हा एकदा आपल्या नगरपालिकेत पाऊल ठेवत आहोत. हा क्षण आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा आहे, अशा शब्दांत अलिबागच्या नवनियुक्त नगराध्यक्षा अक्षया नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना विकासाचा नवा संकल्प सोडला…

अक्षया नाईक यांनी आपल्या भाषणादरम्यान एक अत्यंत वैयक्तिक आणि भावूक आठवण शेअर केली. त्या म्हणाल्या, आज १४ वर्षांनंतर माझी आई त्याच साडीत इथे आली आहे, जी साडी घालून तिने यापूर्वी पालिकेची सेवा केली होती. अलिबागच्या जनतेने माझ्या आईवर जेवढे प्रेम केले, तेवढेच प्रेम मलाही मिळेल, अशी मला खात्री आहे.या विधानामुळे उपस्थितांचे डोळे ओलावले आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले.

माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक (साळुंके साहेब) यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत अक्षया नाईक यांनी स्पष्ट केले की, गेल्या चार वर्षांत जी कामे प्रलंबित राहिली आहेत, ती आता प्राधान्याने पूर्ण केली जातील. शहराच्या प्रगतीसाठी नव्या जोमाने कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि आपुलकी जपण्याचे आश्वासन देत त्या म्हणाल्या,आपण सर्वांनी मिळून सोबत काम करायचे आहे. काम करताना जर माझी कुठे चूक झाली, तर तुमची मुलगी समजून मला हक्काने सांगा. तुमच्या सूचनांनुसारच मी कारभार करेन.
​        यावेळी अलिबागमधील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अक्षया नाईक यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे अलिबाग शहराच्या विकासाला आता नवी गती मिळणार,अशी आशा व्यक्त होत आहे.