अलिबाग नगरपरिषदेत ठाकरे सेनेचा झेंडा; संदीप–स्वेता पालकरांच्या विजयाने कार्यकर्त्यांत नवचैतन्य


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग नगरपरिषदेतील राजकारणात ठाकरे सेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महत्त्वपूर्ण यश मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. शिंदे सेनेला जे साध्य करता आले नाही, ते ठाकरे सेनेने करून दाखवले, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. संदीप पालकर आणि स्वेता पालकर हे दोघेही एकाच प्रभागातून निवडून आल्याने ठाकरे सेनेला अलिबागमध्ये नवे बळ मिळाले आहे.

या यशामुळे पक्षाच्या जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून ते पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले आहेत. काही काळापासून नाराज व निष्क्रिय झालेला पक्षाचा कार्यकर्ता वर्ग पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी बैठका, संपर्क मोहिमा आणि जनतेशी संवाद वाढवण्यावर भर दिला जात आहे.
दरम्यान, या निवडणूक यशानंतर संदीप पालकर यांना ठाकरे सेनेत नवी व महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्ष नेतृत्व त्यांच्यावर विश्वास दाखवून संघटनात्मक किंवा प्रशासकीय पातळीवर मोठी भूमिका सोपवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर तसे झाले, तर अलिबाग नगरपरिषदेत ठाकरे सेनेचा प्रभाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. एकूणच, या घडामोडींमुळे अलिबागमधील राजकारणाला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.