रायगड (प्रतिनिधी) : नववर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनला अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारे सज्ज झाले आहेत. अलिबाग, आक्षी, नागाव, किहीम, आवास, सासवणे, मांडवा या पर्यटनस्थळी २० ते २५ हजार पर्यटक दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि पर्यटनस्थळी न्यू इअर पार्टींचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर विशेष बीच शोचेही आयोजन करण्यात आले असून पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे.
पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. किनाऱ्यांवर गस्ती पथके तैनात करण्यात आली असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. विशेषतः रेव्ह पार्टी किंवा बेकायदेशीर कार्यक्रमांवर पोलिसांचे लक्ष केंद्रित असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणच्या महामार्गांवर अवजड वाहनांना बंदी आदेश जारी केले आहेत. त्यामुळे पर्यटकांची वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.
एकीकडे उत्सवाचा जल्लोष, तर दुसरीकडे सुरक्षिततेची काटेकोर तयारी अशी दुहेरी व्यवस्था प्रशासनाने उभी केली असून, नववर्षाचे स्वागत शांततेत आणि आनंदात व्हावे, यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे चित्र अलिबागमध्ये पाहायला मिळत आहे.
Home ताज्या बातम्या थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी अलिबागचे किनारे सज्ज; हजारो पर्यटक दाखल होण्याची शक्यता









