खळबळजनक ! रवींद्र देवकर यांनीच दिली काळोखेंची २० लाखाची सुपारी 


खोपोलीतील मंगेश काळोखे प्रकरणी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

रायगड (प्रतिनिधी): खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते व नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे प्रकरणी आतापर्यंतचा सर्वात खळबळजनक खुलासा समोर आला असून, रवींद्र परशुराम देवकर यांनीच तब्बल २० लाख रुपयांची सुपारी देऊन गुन्हा घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली करत तपास पथकाने परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक विश्लेषण, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि न्यायवैज्ञानिक अहवालांच्या आधारे हा गुन्हेगारी कट उघडकीस आणला आहे.

पोलिस तपासानुसार, मुख्य आरोपी रवींद्र परशुराम देवकर याचे मंगेश काळोखे यांच्याशी व्यक्तिगत तसेच राजकीय वैमनस्य होते. याच वैमनस्यातून देवकर याने मंगेश काळोखे यांना संपवण्याचा कट रचला. या कटासाठी त्याने ईशा पापा शेख (वय ४६) या परिचित महिलेच्या माध्यमातून आदील मुख्त्यार शेख, खालीद खलील कुरेशी आणि इतर एका आरोपीला २० लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

त्यानुसार २६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ७ वाजता, मंगेश काळोखे यांच्यावर पाळत ठेवून नियोजनबद्ध कट अंमलात आणण्यात आला. यात दर्शन रवींद्र देवकर, महेश शिवाजी धायतडक, आदील मुख्त्यार शेख, खालीद खलील कुरेशी आणि इतर एक अशा ५ जणांचा थेट सहभाग होता. अखेर मंगेश काळोखे यांचा या घटनेत अंत झाला.

या गंभीर गुन्ह्यात सहभागी ईशा पापा शेख आणि आदील मुख्त्यार शेख यांना अटक करण्यात आली असून, खालीद खलील कुरेशी याचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मिळत आहे. सध्या सर्व अटक आरोपी पोलीस रिमांडमध्ये असून, गुन्ह्यातील आर्थिक व्यवहार, इतर सहआरोपी आणि गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांचा तपास सुरू आहे. रायगड पोलीस दलाकडून सांगण्यात आले की, हा खटला विशेष शासकीय अभियोक्त्यांच्या मदतीने जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार असून, गुन्ह्यातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

या खळबळजनक खुलाशानंतर खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सामाजिक व राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मंगेश काळोखे यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.