रायगड (प्रतिनिधी): कुक्कुट खाद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये अग्रेसर असणाऱ्या कुकूचकू कंपनीचे मालक दिलीप पात्रे यांच्या बंगल्यात शनिवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. हत्यारांचा धाक दाखवत आयान पाथरे या चिमुकल्याला घरातून बाहेर नेत पाथरे कुटुंबियांच्या अंगावर पेट्रोल ओतून तब्बल २० लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटत पलायन केले.

मुशेत गावाच्या हद्दीत कुकूचकू कंपनीचे मालक दिलीप पाथरे यांचा बंगला आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाथरे यांच्या बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या वॉल कंपाऊंडला असणाऱ्या तारांच्या जाळ्या तोडून तब्बल नऊ दरोडेखोर बंगल्याच्या आवारात घुसले. त्यांनी बंगल्याच्या मागील बाजूस असणाऱ्या स्लायडिंग विंडो उघडून आता लोखंडी ग्रीलला लावलेले कुलूप आणि काडी कोयंडा हत्यारांनी उपसुन घरात प्रवेश केला. घरात असणाऱ्या खोल्यांमधून त्या दरोडेखोरांपैकी काहींनी घरात लहान असणारा आयान याला हत्याराचा धाक दाखवून बंगल्याच्या बाहेर आणले. जेथून या दरोडेखोरांनी आवारात प्रवेश केला. त्याठिकाणी त्याच्यावर शस्त्र उगारून घरात असणाऱ्या साथीदारांना मोबाईलद्वारे संपर्क केला, त्यानंतर घरात असणाऱ्या दरोडेखोरांनी प्रथम मुख्य दरवाजाला आतून कडी लावून दरवाजाच्या मागील बाजूस कटावणी अडकवून ठेवली आणि घरात झोपलेल्या पाथरे कुटुंबीयांपैकी कुणाल पाथरे आणि त्यांच्या पत्नी विनिता पात्रे जेथे झोपले होते. तेथे प्रवेश केला. आणि त्यांना देखील शस्त्रांच्या दहशतीखाली ठेवले. कुणाल पाथरे यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे दरोडेखोरांसमोर काहीच चालले नाही दरोडेखोरांनी कुणाल आणि त्यांच्या पत्नी विनिता यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी दिली. हळूहळू घरातील सर्व सदस्यांना शस्त्राचा धाक दाखवून उठवले. दिलीप पाथरे आणि त्यांच्या पत्नी माधवी यांनी देखील दरोडेखोरांना प्रति उत्तर केले परंतु या झटापटीत माधवी पाथरे यांच्या हाताला चाकू लागून त्यांचा हात कापला गेला. तर दिलीप पाथरे यांनादेखील दरोडेखोरांनी मारहाण केली. आणि त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतले.

मारहाण करताना तिजोरी कुठे आहे. दागिने आणि लपवूं ठेवलेले पैसे तातडीने काढून द्या अन्यथा तुमच्या घरातील चिमुकला सदस्य अयान याला मारू कारण तो आमच्या ताब्यात असून घराच्या बाहेरील आवारात आहे.
हा सर्व प्रकार घरात असणारी पाथरे यांची नातं ओवी पाथरे पाहत होती. तिला या दरोडेखोरांनी काहीच केले नसल्याचे किंवा घरातील कोणत्याही महिलेला काहीच केले नसल्याचे दरोडेखोरांनी या दहशतीमध्ये असणाऱ्या पाथरे कुटुंबियांना सांगितले. आपला मुलगा दरोडेखोरांच्या ताब्यात आहे. हे कळताच कुणाल पाथरे यांना काळताच त्यांनी प्रसंगावधान राखून वडील दिलीप पाथरे यांना सांगून घरात असणारे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे २० लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांच्या ताब्यात दिला. असणारी रक्कम कमी असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी त्यांना जणू घराची संपूर्ण माहिती आहे अशा अविर्भावात त्यांनी घरात असणारे तळघर दाखवा, घरात असणाऱ्या फोटोची तोडफोड करून सर्व शहानिशा या दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून केली. परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
पाथरे यांच्या बंगल्यामध्ये घुसलेल्या दरोडेखोरांनी चारचाकी आणल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधील चित्रीकरणामधून निष्पन्न झाले आहे. त्या दरोडेखोरांना मार्ग दाखविण्यासाठी एक दुचाकी देखील या चित्रीकरणामध्ये दिसून आली आहे. दरोडेखोर पसार झाल्यानंतर दहशतीमध्ये असणारे पाथरे कुटुंबीयांनी एकमेकाला सावरत अलिबाग पोलीस ठाण्यात संपर्क करून घडलेली घटना सांगितली. अलिबाग पोलिसांची पेट्रोलिंग करणारी गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली . त्यापाठोपाठ अलिबाग पोलिसांची तपस यंत्रणा आणि पोलीस निरीक्षक किशोर साळे देखील पोहोचले. जिल्हा मुख्यालयापासून जवळ असणाऱ्या परिसरात दरोडा पडल्याने स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यादेखील घटनास्थळी पोहचून त्यांनी दहशतीखाली असणाऱ्या पाथरे कुटुंबियांना धीर दिला. दरोडा पडलेल्या ठिकाणी पोलिसांची फॉरेन्सिक टीम उशिरापर्यंत तपास करीत होती. त्यांना घराच्या दरवाजाला अडकवलेली कटावणी सापडली आहे. या कटावणीवर असणाऱ्या पांढऱ्या कागदावर इंग्रजीमध्ये डीएलआर असे शब्द लिहिले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाढलेल्या गाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे.

********
अलिबाग तालुक्यातील मापगांव नजीकच्या मुशेत येथे पडलेल्या दरोड्याचा तपास सुरू आहे. या दरोड्यात सामील असलेल्या काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्याप काही आरोपींना शोधण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच हा दरोड्याचा गुन्हा रायगड पोलीस उघड करतील.
आंचल दलाल
जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड









