अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग शहरातील सिद्धार्थनगर परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या विकासकामाची अखेर सुरुवात झाली आहे. या अंतर्गत रस्त्यावर पेवर ब्लॉक बसविणे तसेच रस्त्यालगत गटार बांधकाम करण्याच्या कामाचा शुभारंभ अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष कु. अक्षया नमिता प्रशांत नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या विकासकामामुळे परिसरातील रस्त्याची दुरवस्था दूर होऊन नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतुकीचा लाभ मिळणार आहे.
या प्रसंगी नगरसेवक ॲड. निलम हजारे, श्री. अनिल चोपडा यांच्यासह परिसरातील अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमावेळी बोलताना नगराध्यक्ष कु. अक्षया नाईक यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले. रस्ते व गटारांची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या विकासकामामुळे सिद्धार्थनगर परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









