नवी मुंबईच्या तुर्भेमधील ‘राज’ लॉजमध्ये अनैतिक कृत्यांचा नंगानाच !


७ जणींची सुटका तर तरुणींचा सौदा करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

तुर्भे नाका परिसरात अनैतिक मानव तस्करी विरोधी विभागाची धडक कारवाई

लॉज व्यवस्थापकासह महिला पुरवठादार व वेटर अटकेत; मुख्य आरोपी फरार

 नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी): नवी मुंबईच्या तुर्भे नाका परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर देहविक्री व्यवसायाचा अनैतिक मानव तस्करी विरोधी विभागाच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ७ महिलांची सुटका करत रॅकेटशी संबंधित ३ आरोपींना अटक केली आहे. लॉजचा संचालक करणाकर शेट्टी हा फरार असून, त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे.

अनैतिक मानव तस्करी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्भे नाका भागातील लॉजमध्ये ग्राहकांकडून ३ हजार ते ५ हजार रुपये रक्कम घेऊन महिला व तरुणींचा सौदा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला लॉजमध्ये पाठवले. यावेळी बनावट ग्राहकाने पसंद केलेल्या महिलेकरीता मोबदला म्हणून ३५०० रूपये बनावट ग्राहकाकडुन स्वीकारण्यात आले. या अवैध प्रकाराची पुष्टी होताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकला.

यावेळी लॉजमध्ये ७ महिलांना देहव्यापारासाठी ठेवण्यात आल्याचे आढळले. घटनास्थळी लॉज व्यवस्थापक अजय कैलास गोस्वामी, महिला पुरवठादार किशोर पूर्णचंद्र साहू आणि वेटर अजय कुमार यांना अटक करण्यात आली. तपासात आरोपी संगनमत करून महिलांना लॉजमध्ये ठेवत, ग्राहकांच्या पसंतीनुसार व्यवहार ठरवत व मिळालेली रक्कम आपसात वाटून घेत असल्याचेही उघड झाले आहे.

पोलिसांनी बनावट ग्राहकाकडून दिलेली रक्कम जप्त केली असून ती महत्त्वाचा पुरावा मानली जात आहे. या प्रकरणी अटक आरोपींना न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तुर्भे पोलीस पुढील तपास करत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.