रायगड (विशेष प्रतिनिधी): रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधींनी प्राधान्य देणे अपेक्षित असताना, डॉनगिरीच्या राजकारणात अडकून जिल्ह्याच्या विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा व रोजगारनिर्मिती यांसारखे मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. मात्र सत्ताधारी आणि विरोधक दोघेही वैयक्तिक राजकीय वर्चस्व आणि डॉनगिरी टिकवण्याच्या स्पर्धेत गुंतलेले दिसत आहेत.
याआधी तटकरे यांच्या काळात जिल्ह्याच्या विकासापेक्षा राजकीय गणितांनाच अधिक महत्त्व दिले गेल्याचा आरोप होत होता. त्यानंतर दळवी यांनीही सत्तेचा उपयोग लोकहितासाठी न करता गटबाजी आणि राजकीय संघर्षातच अधिक ऊर्जा खर्च केल्याची टीका झाली. आता पाटील यांच्याकडूनही नागरिकांना विकासाच्या अपेक्षा असतानाच, तेही त्याच मार्गावर जात असल्याची चर्चा सुरू आहे.
रायगड जिल्हा औद्योगिक, पर्यटन व कृषी क्षेत्रात मोठी क्षमता असलेला जिल्हा आहे. मात्र नेतृत्वाच्या उदासीनतेमुळे ही क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही. विकासकामे रखडत असून सामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. आता तरी राजकीय डॉनगिरी बाजूला ठेवून जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य द्यावे, अशी जोरदार मागणी रायगडवासीयांकडून होत आहे.









