झेप फाउंडेशनतर्फे ‘सौभाग्याचं लेणं’ हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात; स्व. मीनाक्षीताई पाटील यांना भावपूर्ण आदरांजली


अलिबाग (प्रतिनिधी): महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या झेप फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मकर संक्रांतीचे औचित्य साधून ‘सौभाग्याचं लेणं’ अर्थात हळदी–कुंकू कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. २००९ पासून अखंडपणे सुरू असलेला हा उपक्रम आज दि. १४ जानेवारी २०२६ रोजी नवीनगर फाटा, बांधण (कुईस रोड) येथे अत्यंत दिमाखात पार पडला.
यंदाच्या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे स्वर्गीय सासूबाई मीनाक्षीताई पाटील यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी मीनाक्षीताईंच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल आठवणींना उजाळा दिला. झेप फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. सौ. चित्रा आस्वाद पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. “मीनाक्षीताई आपल्या सोबत असताना जसा या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत होता, तसाच प्रेमाचा ओघ आजही कायम आहे. त्या आज प्रत्यक्ष आपल्यात नसल्या तरीही आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, हे पाहून मन भरून आले. या पाठिंब्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे,” असे भावूक उद्गार त्यांनी काढले.
या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. मकर संक्रांतीचा आनंद साजरा करताना महिलांमध्ये सामाजिक बांधिलकी, एकोप्याचा आणि सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी झेप फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.