पनवेल प्रभाग १९ मधील मतदान केंद्रावर गोंधळ, भाजप–महाविकास आघाडी कार्यकर्त्यांत वाद


अलिबाग (प्रतिनिधी): पनवेल महानगरपालिका निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक १९ मधील गुजराती शाळेतील मतदान केंद्रावर आज सकाळी मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली. मतदान सुरू असतानाच भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला, जो काही वेळातच भांडणात परिवर्तित झाला. त्यामुळे मतदान केंद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
एका मतदाराने दुबार मतदान केल्याचा आरोप करत संबंधित मतदाराला तात्काळ लॉकअपमध्ये टाकावे, अशी मागणी एका व्यक्तीकडून करण्यात आली. या मागणीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप–प्रत्यारोप सुरू झाले. काही काळ परिस्थिती इतकी बिघडली की मतदान प्रक्रिया थांबण्याची शक्यता निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समज दिली तसेच मतदान केंद्र परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली.
सदर घटनेमुळे मतदारांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे पुढील अनर्थ टळला. पोलीस प्रकरणाचा तपास करत असून, दोषींवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.