अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग रेवस मार्गावर आज संध्याकाळी झालेल्या अपघातात एक १३ वर्षांची मुलगी जागीच ठार झाली तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघा गंभीर जखमींना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. तर एकावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातातील मृत आणि जखमी एकाच कुटुंबातील आहे.
मुंबईतील कुलाबा इथं राहणारे आई वडील आणि दोन मुली असे चौघेजण रेवस इथं नातेवाईकांच्या घरी सांत्वनासाठी आले होते. तिथं नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर अलिबाग जवळ संगम इथं श्री खंडोबाच्या सोहळ्यासाठी चौघेजण मोटार सायकल वरून आले होते. खंडोबाचे दर्शन घेऊन परतत असताना कनकेश्वर फाटा इथं समोरून येणाऱ्या बसची त्यांच्या मोटार सायकलला धडक बसली. या अपघातात १३ वर्षांची मुलगी जागीच ठार झाली.
तर महिला आणि एक मुलगी गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. तर जखमी पुरुषावर अलिबाग इथल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती.









