शिवसैनिकांनी एकजुट दाखवा, विजय आपलाच : ना. भरतशेठ गोगावले महाडमध्ये शिवसेनेचे जोरदार शक्ती प्रदर्शन


महाड(रेश्मा माने): महाड नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवून जसा करिष्मा केला तसाच करिष्मा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून करून दाखवायचा आहे. शिवसैनिकांनी एकजूट दाखवली तर विजय आपलाच असून आपल्याला हरवण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही असे प्रतिपादन रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महाड तालुक्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचे अर्ज भरण्याच्या वेळी महाडच्या छ. शिवाजी महाराज चौकात जमलेल्या हजारो शिवसैनिकांसमोर केले.
महाड तालुक्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या ५ व पंचायत समितीच्या १० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाड मधील छ. शिवाजी महाराज चौकात जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले यांनी छ. शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांची रॅली छ. शिवाजी चौक ते प्रांत कार्यालया पर्यत काढण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमा गोगावले,उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष विजय सावंत, तालुका प्रमुख बंधु तरडे, युवा सेना ता. प्रमुख रोहीदास अंबावले, नगराध्यक्ष सुनिल कविस्कर यांच्या सह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. गोगावले यांनी शिवसेनेच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र झाले आहेत मात्र शिवसैनिकांनी एकजुठ दाखवून सर्वाना सोबत घेतले तर आपला विजय नक्कीच आहे. ज्यांना तिकीट भेटले नाही त्यांचा विचार संघटनेत केला जाईल, मतदार संघात जी हजारो कोटीची विकास कामे केली, जनतेने सांगितले ती कामे केली तसे वागलो राज्याचा मंत्री असल्याने अन्य मतदार संघाची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाने आपणच भरतशेठ, विकासशेठ व सुषमा गोगावले समजून या निवडणुकीत झोकून द्या, गोगावले कुटुंबाने मतदार संघावर जे प्रेम केले त्याची परतफेड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून करा असे आवाहन ना. गोगावले यांनी केले.