आंबेपूर जि.प. मतदारसंघातून शिवसेनेच्या रसिका राजा केणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल


अलिबाग (प्रतिनिधी): आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून रसिका राजा केणी यांनी आपला उमेदवारी अर्ज आज उत्साहपूर्ण वातावरणात दाखल केला. नॉमिनेशन फॉर्म भरताना त्यांच्यासोबत आमदार महेंद्र शेठ दळवी, सौ. मानसीताई दळवी, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवसेनेच्या घोषणा देत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. आंबेपूर मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने काम करण्याचा संकल्प रसिका केणी यांनी यावेळी व्यक्त केला.
स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या माध्यमातून जनतेच्या विश्वासास पात्र ठरून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.