सातीर्जे गावात माघी गणेशोत्सवाचा जल्लोष


राजाभाऊ ठाकूर भक्तीत तल्लीन, ढोलकीच्या तालावर धरला ठेका

अलिबाग(प्रतिनिधी): भक्ती, शक्ती आणि परंपरेचा त्रिवेणी संगम असलेल्या सातीर्जे गावात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘माघी गणेशोत्सव’ अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. काँग्रेसचे लोकप्रिय नेते राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सोहळ्याने संपूर्ण गावाला भक्तीच्या रंगात न्हाऊ घातले.

उत्सवाच्या सुरुवातीला सातीर्जे येथील गणेश मंदिरात बाप्पाची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी राजाभाऊंनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत, पूजेचा प्रथम मान मंदिरात सेवा देणाऱ्या पुजाऱ्यांचा केला. त्यानंतर राजाभाऊंनी सहपत्नीक बाप्पाची पूजा केली. यावेळी ठाकूर कुटुंबियांसह गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाप्पाचा जन्मोत्सव आणि आरतीने वातावरणात चैतन्य निर्माण केले.

या सोहळ्यातील सर्वात लक्षणीय आणि कौतुकास्पद बाब म्हणजे राजाभाऊंची धार्मिक ओढ. राजकारणाच्या धावपळीच्या आयुष्यात, शेकडो कामांचे ‘शेड्युल’ मागे सारून राजाभाऊंनी बाप्पाच्या चरणी स्वतःला झोकून दिले. आरती दरम्यान राजाभाऊ चक्क ढोलकी वाजवण्यात इतके तल्लीन झाले होते की, त्यांच्यातील कार्यकर्ता आणि नेता बाजूला राहून एक निष्ठावान भक्त साऱ्यांनी अनुभवला. त्यांच्या या साधेपणाची आणि भक्तीची चर्चा संपूर्ण सातीर्जे गावात रंगली आहे.

पूजेनंतर गावातील सर्व आबालवृद्धांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये गावातील कलाकारांनी आपली कला सादर केली.

राजाभाऊ ठाकूर यांनी केवळ राजकीय नेतृत्व न करता, गावातील सण-उत्सवांत स्वतःला सामावून घेत सातीर्जेकरांची मने जिंकली आहेत. कार्य कितीही मोठे असले तरी ईश्वराची सेवा हीच सर्वोच्च आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली हा माघी गणेशोत्सव भक्तीभावाने आणि प्रचंड जल्लोषात निर्विघ्नपणे पार पडला.