अलिबाग(प्रतिनिधी): रस्ता सुरक्षा अभियान – जानेवारी २०२६ अंतर्गत अलिबाग कॅम्प येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण-रायगड यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
तपासणी पथकात वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कार्वेकर, डॉ. राजाराम हुलवान तसेच नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. श्रद्धा कुदळे यांनी नागरिकांची तपासणी केली. या उपक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड यांचे सहकार्य लाभले. शिबिरामध्ये ९० नागरिकांची मोफत नेत्र तपासणी तर ७८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, अलिबाग याबाबत माहिती देण्यासाठी चिन्मय तळेकर उपस्थित होते.
तसेच शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती व इतर कार्यालयीन कामकाजासाठी आलेल्या उमेदवारांना आणि उपस्थित वाहन चालक-मालकांना हेल्मेट व सीटबेल्टचे महत्त्व, ‘वॉक ऑन राईट’, गुड समॅरिटन नियम, गोल्डन अवरचे महत्त्व, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे तसेच इतर रस्ता सुरक्षा नियमांविषयी मार्गदर्शन मोटार वाहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन मोटार वाहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर, किरण लोंढे, सहायक मोटार वाहन निरीक्षक अक्षय तुपसमुद्रे व विशाल जाधव यांनी केले. यावेळी श्री साई मोटार ट्रेनिंग स्कूलतर्फे मेहुल पाटील तसेच रॉयल मोटार ट्रेनिंग स्कूलतर्फे शैलेश घरत उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत अशा जनजागृतीपर उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे.









