अलीबाग (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या बुधवार, २८ जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी निधनामुळे अलिबाग तालुक्यात शोककळा पसरली असून, यानिमित्ताने तालुक्यातील सर्व सभा व प्रचार दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अलिबाग–मुरुड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक यांनी दिली. या दुःखद घटनेनंतर पक्षाने तात्काळ निर्णय घेत संपूर्ण तालुक्यातील प्रचार उपक्रम थांबवले आहेत.
अमित नाईक यांनी सांगितले की, अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत्या दोन दिवसांत अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या शोकसभेत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. २७ जानेवारी रोजी उमेदवारी माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन चिन्ह वाटप झाले असून प्रचारासाठी केवळ सात दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळताच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आजच्या दिवसातील सर्व प्रचार दौरे, सभा व बैठका पूर्णतः रद्द करण्यात आल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. पक्ष शोक व्यक्त करत या कठीण काळात संयम पाळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Home ताज्या बातम्या अजित पवार यांच्या निधनाने अलिबाग तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व प्रचार दौरे व सभा...









