आंबेपूर मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश


अलिबाग (प्रतिनिधी): आंबेपूर मतदारसंघातील राजकीय समीकरणांना मोठा धक्का देणारी घडामोड समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे पोयनाड ग्रामपंचायत सदस्य अजित चवरकर व उमेश राऊत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश अलिबाग–मुरुड–रोहा विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी तसेच शिवसेनेचे अलिबाग पंचायत समितीतील आंबेपूर गणाचे उमेदवार शैलेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
या पक्षप्रवेशामुळे आंबेपूर मतदारसंघात शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून विरोधी पक्षांना हा मोठा राजकीय हादरा मानला जात आहे. शिवसेनेच्या विकासात्मक धोरणांवर आणि स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी नवनियुक्त कार्यकर्त्यांचे स्वागत करत शिवसेना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारा पक्ष असल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी येणाऱ्या निवडणुकांत शिवसेना आंबेपूर मतदारसंघात भक्कम यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला. या घडामोडीमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.