अलिबाग समुद्रकिनारील मत्सालयाच्या कामास पुन्हा गती; नगराध्यक्ष कु. अक्षया नाईक यांची पाहणी


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग समुद्र किनारी सुरू असलेल्या मत्सालयाच्या कामाची नगराध्यक्ष कु. अक्षया नमिता प्रशांत नाईक यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा अलिबाग नगरपरिषदेचे गटनेते श्री. प्रशांत मधुसूदन नाईक हेही उपस्थित होते. सदर मत्सालयाचे काम काही तांत्रिक अडचणींमुळे गेल्या काही काळापासून बंद होते. मात्र आता त्या अडचणी दूर करण्यात आल्या असून काम पुन्हा जोमाने सुरू करण्यात आले आहे.

पाहणीदरम्यान नगराध्यक्ष कु. अक्षया नाईक यांनी सुरू असलेल्या कामाची सविस्तर माहिती घेतली तसेच कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. नागरिकांना लवकरात लवकर या सुविधेचा लाभ मिळावा, यासाठी काम ठरलेल्या वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित कंत्राटदारास देण्यात आल्या. कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी पाणी सभापती तथा नगरसेवक श्री. अनिल चोपडा यांच्यासह अन्य नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अलिबाग शहराच्या सौंदर्यात भर घालणारे व स्थानिक मच्छीमार तसेच नागरिकांसाठी उपयुक्त ठरणारे हे मत्सालय लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.