मुंबई (धनश्री रेवडेकर):राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाल्यानंतर, त्यांचीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही निवड व्हावी, अशी मागणी पक्षातील काही आमदारांनी जोर धरला आहे. याचबरोबर पक्षाला भाजपच्या प्रभावाखाली नेले जात असल्याबद्दलही आमदारांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे.
रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदाच्या निवडीसाठी अजित पवार यांच्या विधानभवनातील दालनात आमदारांची बैठक झाली. ही बैठक दुपारी अडीच वाजता संपली. त्यानंतर ठरावाचे पत्र मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे वरिष्ठ नेते ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रवाना झाले.
दरम्यान, बैठक झालेल्याच दालनात काही नाराज आमदार आणि मंत्र्यांनी स्वतंत्रपणे एक अनौपचारिक बैठक घेतली. या बैठकीत पक्षातील सध्याच्या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “पक्षात काय सुरू आहे, याबाबत आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. आजच्या बैठकीत अनेकांना बोलण्याची संधीच दिली गेली नाही. पक्षाध्यक्षपदाबाबत काय निर्णय झाला आहे, याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही,” असा आरोप या आमदारांनी केला.
या आमदारांचे म्हणणे आहे की, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा पवार कुटुंबातीलच असावा आणि सुनेत्रा पवार यांनीच हे पद स्वीकारावे. तसेच पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत किंवा भाजपशी असलेल्या राजकीय समीकरणांबाबत स्पष्टता नसल्याने पक्ष हळूहळू भाजपच्या “दावणीला बांधला जात आहे”, असा संतापही व्यक्त करण्यात आला.
बैठकीनंतर अनेक आमदार शपथविधीसाठी बाहेर पडले होते. त्यामुळे या अनौपचारिक बैठकीतील हालचालींची त्यांना माहिती नव्हती. मात्र, उपस्थित आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पाठिंबा दर्शवणाऱ्या निवेदनावर सह्या केल्या.
या निवेदनावर पाथरीचे आमदार राजेश विटेकर, अणुशक्ती मतदारसंघाच्या आमदार सना मलिक, अंमळनेरचे आमदार अनिल पाटील, मावळचे आमदार सुनील शेळके, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी तात्काळ सह्या केल्या.
पत्रावर सह्या केलेल्या आमदारांनी सांगितले की, आणखी काही आमदार या निवेदनावर सह्या करणार आहेत. सोमवारी हे निवेदन थेट सुनेत्रा पवार यांच्याकडे सादर करण्यात येणार असून, पक्षाध्यक्ष निवडीसाठी स्वतंत्र बैठक बोलावण्याची मागणी पक्षाच्या सरचिटणीसांकडे केली जाणार आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घराणेशाहीच्या मुद्द्यावरही चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या तुलनेत भाजपमध्ये घराणेशाहीचे प्रमाण कमी असल्याचे अनेकांचे मत आहे. तसेच डाव्या पक्षांमध्ये कधीच घराणेशाहीला स्थान दिले गेले नाही. मात्र, अनेक प्रादेशिक पक्षांमध्ये राजघराण्याच्या धर्तीवर नेतृत्वाचा वारसा पुढे दिला जात असल्याचे चित्र वारंवार दिसून येते.
Home ताज्या बातम्या “पक्षाध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत वाद; सुनेत्रा पवारांच्या नावावर आमदारांचे निवेदन”









