कारवर ‘पोलीस’ अशी नेमप्लेट तर गाडीत ‘ओळखपत्र’ असल्याने खळबळ
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र अनेक वाहनांचे मोठे नुकसान
नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबईत मद्यधुंद अवस्थेत कार चालवत चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. करावे गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने रस्त्यावर उभ्या तसेच चालू असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर कारवर ‘पोलीस’ अशी नेमप्लेट आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अपघातानंतर कारची तपासणी केली असता, त्यामध्ये मुंबई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण बबन पोखरकर यांचे ओळखपत्र आढळून आल्याची माहिती मिळत आहे. ही बाब समोर आल्यानंतर प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. संबंधित व्यक्ती खरोखर पोलिसच अधिकारी आहे की नेमप्लेट आणि ओळखपत्राचा गैरवापर करण्यात आला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.









