ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल


अलिबाग (प्रतिनिधी): जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चौल येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. विजयी उमेदवाराच्या गाडीवर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह १० ते १२ जणांविरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना उमेदवार सचिन राऊळ यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते एका गाडीतून देवदर्शनासाठी जात होते. यावेळी चौल परिसरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या गाडीला अडवले. त्यानंतर लाठ्या-काठ्यांनी गाडीवर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडल्या तसेच गाडीत असलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी कार्यकर्त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
या प्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत. निवडणूक निकालानंतर झालेल्या या हिंसाचारामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.