रायगड जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात


अलिबाग(प्रतिनिधी): रायगड जिल्हा पोलीस भरती सन 2024-25 साठी दिनांक 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत रायगड–अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात शारीरिक चाचण्या घेण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
सदर भरतीत पोलीस शिपाई पदाच्या 94 जागा व चालक पोलीस शिपाई पदाच्या 3 जागांचा समावेश आहे. पोलीस शिपाई पदासाठी 3563 अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये 2915 पुरुष व 648 महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर चालक पोलीस शिपाई पदासाठी एकूण 1810 अर्ज दाखल झाले आहेत.
भरती प्रक्रियेसाठी 42 पोलीस अधिकारी, 329 पोलीस अंमलदार व 36 नागरी कर्मचारी असे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी, छायाचित्र नोंदणी, चिप रजिस्ट्रेशन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण मैदानावर नजर ठेवणे तसेच प्रत्येक इव्हेंटचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. आधुनिक RFID तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे.
भरती प्रक्रियेत कोणत्याही गैरप्रकाराला थारा दिला जाणार नसून उमेदवारांनी दलाल व फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष व पारदर्शक राहील, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.