खोपोली (प्रतिनिधी): मुंबई–पुणे जुना महामार्गवरील बोरघाटातील अंडा पॉईंटजवळ ब्रेक फेल झालेल्या टेम्पोने हाइट्स बॅरिकेट्स (कमानी)ला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. टेम्पोमधील लोखंडी पाईप शेजारील दोन कारवर कोसळल्याने दोन्ही कारचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो (क्रमांक MH 43 Y 3703) हा पुण्याहून मुंबईकडे लोखंडी पाईप घेऊन जात होता. दस्तुरी येथील तीव्र उतारावर येताच टेम्पोचे ब्रेक निकामी झाले. चालकाने वाहनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र अंडा पॉईंटजवळील बॅरिकेट्सला जोरदार धडक बसली आणि टेम्पो कमानीत अडकला.
धडकेनंतर टेम्पोमधील लोखंडी पाईप बाजूने जात असलेल्या दोन कारवर पडले. त्यापैकी एका कारमध्ये चालक अडकून पडला होता. स्थानिकांच्या मदतीने त्याला तात्काळ बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या कारमधील एक प्रवासीही जखमी झाला आहे. दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग पथक, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, घाटातील मेकॅनिक, क्रेन ऑपरेटर, डेल्टा फोर्स तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने टेम्पो व लोखंडी पाईप बाजूला करून काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र मोठी जीवितहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.









