अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) झेप घेतली आहे. त्यांची नुकतीच पुणे येथे महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त शुक्रवारी (ता.13) त्यांचा रायगड जिल्हा परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांना निरोपही देण्यात आला.
सन 2002मध्ये महाराष्ट्र विकास सेवेत प्रवेश केलेल्या सत्यजित बडे यांनी गेली अडीच दशके राज्याच्या ग्रामीण व जिल्हास्तरीय प्रशासनात ठसा उमटवला. गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशा प्रत्येक जबाबदारीत त्यांनी कामापेक्षा परिणामांवर भर दिला. कोल्हापूर येथे 1973मध्ये जन्मलेल्या सत्यजित बडे यांनी पुण्यातील गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्थेतून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षेच्या कठीण प्रवासातून त्यांनी सन 2002मध्ये विकास सेवेत यश संपादन केले. त्यांचे वडील कै. देवीदास बडे हे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी सातारा जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून जबाबदार्या पार पाडल्या होत्या. या पाश्र्वभूमीमुळे प्रशासनातील मूल्ये, शिस्त आणि जबाबदारी यांची जाण लहानपणापासूनच त्यांच्या जडणघडणीत रुजली. सन 2002 ते 2007 या कालावधीत आंबेगाव आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी विकासकामांना गती दिली. पुढे पुणे आणि सातारा जिल्हा परिषदांमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय शिस्त आणि कार्यक्षमतेचा आदर्श ठेवला.
सन 2019मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी वर्धा जिल्हा परिषदेत महत्त्वाची भूमिका बजावली. सन पासून 2023ते रायगड जिल्हा परिषद येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असून ग्रामीण विकासाच्या दृष्टीने त्यांचे काम विशेष लक्षवेधी ठरले आहे. गटविकास अधिकारी असताना विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. सन 2012मध्ये मिळालेला ‘यशवंत गुणवंत अधिकारी’ पुरस्कार त्यांनी अत्यल्प वयात मिळवून वेगळी ओळख निर्माण केली. यशवंत पंचायतराज अभियानातील त्यांचे योगदानही उल्लेखनीय आहे.
या वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, नवनियुक्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन जालिंदर पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग विशाल तनपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम, शिक्षणाधिकारी प्राथमिक ललिता दहितुले, जिल्हा कृषि अधिकारी पवनकुमार नजन, यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी काही अधिकारी व कर्मचा-यांनी प्रातिनिधीक स्वरूपात आयुक्त सत्यजित बडे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Home ताज्या बातम्या दिव्यांग कल्याण आयुक्त सत्यजित बडे यांचा सत्कार रायगड जिल्हा परिषदेकडून भावपूर्ण निरोप









