म्हात्रोळीतील जमिनीच्या वादाचा व्हिडीओ व्हायरल; अध्यक्ष राहुल नार्वेकर दिसत असल्याचा दावा


अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात घडलेल्या एका व्हिडीओमुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
व्हिडीओत एका कुटुंबाचा जमिनीच्या मोजणीवरून वाद होत असल्याचे दिसून येते. जमीनमालक कुटुंबातील सदस्य लग्नसमारंभासाठी बाहेर गेले असताना त्यांच्या गैरहजेरीत जमिनीची मोजणी करण्यात आल्याचा आरोप संबंधित कुटुंबाने केला आहे. ‘चूक तुमची आहे…’ असे शब्द व्हिडीओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत असून ते राहुल नार्वेकर यांना उद्देशून बोलले जात असल्याचे सांगितले जात आहे.
अलिबाग तालुका हा मुंबईजवळील निसर्गरम्य आणि उच्च मूल्याच्या जमिनींसाठी ओळखला जातो. येथे अनेक राजकीय नेते, व्यावसायिक आणि कलाकारांची मालमत्ता आहे. त्यामुळे जमिनीच्या व्यवहारांबाबत वाद निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. संबंधित व्हिडीओची सत्यता आणि संपूर्ण पार्श्वभूमी स्पष्ट होणे अद्याप बाकी असून प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

महत्वाची नोंद : या व्हायरल व्हिडीओची स्वतंत्ररीत्या पडताळणी केलेली नसून, मेट्रो रायगड या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही. प्रशासनाकडून किंवा संबंधित व्यक्तींकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच पुढील तपशील स्पष्ट होऊ शकतील.