अलिबाग (प्रतिनिधी): येथील लायन्स क्लब ऑफ अलिबाग आणि लायन्स क्लब ३२३१A२ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक चाईल्डहूड कॅन्सर डे’च्या औचित्याने लायन्स हेल्थ फाउंडेशन , चोंढीयेथील नेत्र रुग्णालयाच्या प्रांगणात कॅन्सर पीडित मुलांची सहल आयोजित केली होती . नेहमीच्या हॉस्पिटलमधील वातावरणापासून दूर जाऊन एक दिवस निसर्गाचे सान्निध्यात या मुलांना नेऊन त्यांना आनंद अनभवू द्यावा, हा यामागील प्रमुख उद्देश होता.६५ मुले आपल्या पालकांसह नाचगाणी, गप्पागोष्टी, फनी गेम्स, विनोद , मनमुराद भटकंतीत रमली. कराओकेवर गाणी गाऊन मुलांसहित त्यांचे पालकही आनंदात सहभागी झाले. क्षणभर ही मुले आणि त्यांचे पालक आपला आजार, दु:ख विसरले हा अनुभव खूप समाधान देणारा होता.
यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर अनिल म्हात्रे यांच्या सौजन्याने फेरीबोटीतून समुद्र सफरीचा , तर लायन नयन कवळे यांनी बससेवा उपलब्ध करून संपूर्ण सागरी पट्ट्यावरील फेरफटका मारण्याचा आनंद दिला. मुले आणि पालकांसहित इतर सर्व उपस्थितांना न्याहारी आणि उत्कृष्ट स्नेहभोजनासाठी लायन नितीन अधिकारी,अमोघ किंजवडेकर यांनी परिश्रम घेतले.
क्षणभर दु:ख विसरून आनंदात न्हाऊन काढणाऱ्या या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रवीण सरनाईक, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अनिल जाधव, चाईल्डहुड कॅन्सरचे डीसी देवरतन डागा, अडिल मिस्त्री, शिवकुमार साखरदांडे, लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव महेश कवळे, खजिनदार अमोघ किंजवडेकर, महेंद्र पाटील, नितीन शेडगे, लायन ऋषी ओबेरॉय, रुपेश मेहता, डॉ अर्नि बुहारिवाला , शुभांगी कुडतलकर , इतर लायन मेंबर्स, कॅन्सर पीडित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे कर्मचारी, पीडित मुले आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









