राजिपतर्फे शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळा


अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत प्रथम फाउंडेशन व महानगर गॅस प्रा. लि. यांच्या सहकार्याने सोमवारी (ता.16) अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हाॅल येथे जिल्ह्यातील केंद्रप्रमुख, शिक्षक, गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षणाधिकारी प्राथमिक ललिता दहितुले, उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे,उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, विस्तार अधिकारी कल्पना काकडे, निपुण महाराष्ट्र जिल्हा समन्वयक क्षमा खेडेकर, जिल्हा समन्वयक निनाद नागले, प्रथम फाउंडेशनचे राज्य कार्यक्रम प्रमुख शंकर पौळ यांच्यासह एकूण 170 केंद्रप्रमुख, शिक्षक व गटशिक्षण अधिकारी कार्यशाळेसाठी उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत प्रामुख्याने ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि डिजिटल शाळा, पायाभूत सुविधा, व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींवर लक्ष केंद्रित केले जात आहे. आधुनिक अध्यापन पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी अलिबागमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
राजिपच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची भाषा व गणित या विषयाच्या घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रगतीचा आलेख यावेळी सादर करण्यात आला व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्याच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर शिक्षक, केंद्रप्रमुखांना आधुनिक अध्यापन पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने भाषा व गणित या अंतर्गत येणा-या सर्व विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आकलन क्षमता वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
ओपन लिंक फाउंडेशन (विनोबा) यांच्यामार्फत समन्वयक वैभव शिर्के यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शिष्यवृत्ती सराव परीक्षा व गुणवत्तेसाठी चांगले काम करणा-या एकूण 11 शाळा तसेच ‘पोस्ट आॅफ मंथ’ ठरलेल्या 7 शिक्षक व 3 केंद्रप्रमुखांचा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.