नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स कार्गो हबमुळे महाराष्ट्राच्या व्यापाराला नवी गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नवी मुंबई (धनश्री रेवडेकर) : फेडेक्स च्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्स येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील उद्योग, निर्यात व व्यापाराला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीत फेडेक्सने मुंबईत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, ही महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवरील जागतिक विश्वासाची पावती आहे. नवी मुंबई विमानतळ भविष्यात देशातील प्रमुख व सर्वाधिक व्यस्त प्रवासी व कार्गो विमानतळ ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये:
३ लाख चौरस फूट क्षेत्रफळाचे अत्याधुनिक, पूर्णपणे स्वयंचलित एअर कार्गो हब
सुमारे २,५०० कोटी रुपयांची दीर्घकालीन गुंतवणूक (२५० दशलक्ष अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक)
सुमारे ६,००० थेट व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती
प्रारंभी ०.५ दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक कार्गो क्षमता; पुढे ३.२५ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढ
दक्षिण-पूर्व आशिया, पश्चिम आशिया, युरोप व अमेरिका बाजारपेठांशी थेट संपर्क
फेडेक्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी राज सुब्रमण्यम यांनी सांगितले की, हा भारतातील फेडेक्सचा पहिलाच समर्पित हब असून, जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानासह उभारला जाणार आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय पुरवठा साखळी क्षमतावृद्धी आणि पीएम गतिशक्ती उपक्रमाशी सुसंगत आहे.
या सुविधेमुळे इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती, कृषी व नाशवंत वस्तू क्षेत्रांना जलद आणि विश्वासार्ह सेवा मिळणार असून, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या निर्यात-आयात क्षमतेत वाढ होणार आहे.