रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र गट नोंदणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाजप-राष्ट्रवादी युती जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार असल्याचे जाहीर केले आहे. दोन्ही पक्षांकडे बहुमत असल्याने तिसऱ्या पक्षाला सत्तेत सहभागी करून घेण्याची गरज नसल्याची भूमिका घेतली जात आहे. मात्र, सत्तेत सहभागी होण्यासाठी शिंदे सेनेने वरिष्ठ पातळीवरून भाजप व राष्ट्रवादीवर दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने वर्चस्व राखले असून ठाकरे गट आणि काँग्रेसला मर्यादित यश मिळाले आहे. दरम्यान, शिंदे सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचालींमुळे मंत्री भरतशेठ गोगावले आक्रमक झाले आहेत. ‘महायुतीत एकत्र असू तर एकत्र यायला हवे, अन्यथा पुढे वेगळा विचार करू,’ असा इशारा त्यांनी भाजप व राष्ट्रवादीला दिला आहे. या घडामोडींमुळे रायगडमधील राजकीय वातावरण तापले असून पुढील सत्ता समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









