मराठी भाषा गौरव दिन’ व ‘विज्ञान दिन’ चिंतामणराव केळकर विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरे.


अलिबाग(प्रतिनिधी): चितामणराव केळकर विद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ व ‘ विज्ञान दिन’ यांचे औचित्य साधून दोन्ही विषयांवर आधारीत प्रदर्शन भरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ‘ग्रंथदिंडी’ ने झाली. या प्रदर्शनाचे उद्घाटन, शाळेचे पालक असलेले श्री. ए. ए. सानप यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात नाटकांचे विविध प्रकार (उदा. पौराणिक, ऐतिहासिक, रहस्यमय, सामाजिक, विनोदी, दशावतारावर आधारीत इ.) प्रतिकृतींच्या रुपात मांडण्यात आले होते. त्या संदर्भातील नाटककारांची माहिती तक्तेरुपात सादर करण्यात आली. जुन्या मराठी कवितांचे स्मरण करून देणारा ‘कवितांचा कोपरा’ तयार करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या नाटय व संगीत क्षेत्रातील कलागुणांना सादर करण्याची संधीही यावेळी देण्यात आली. तसेच शाळेच्या ग्रंथालयात असणाऱ्या पुस्तकांचेही प्रदर्शन मांडण्यात आले होते.

‘विज्ञान प्रदर्शन’ही नाविन्यपूर्ण होते. आपली कल्पकता वापरून रोबोटस्च्या प्रतिकृती, डी. एन्. ए. प्रतिकृती, बीट द बझ, सोलर सिस्टिम, वॉर्निंग अलार्म, वॉश युवर हँडस् तसेच इतर अनेक प्रतिकृती तयार केल्या होत्या. केलेली सजावटही विज्ञान प्रदर्शनास उठाव देणारी अशी होती. गणित विषयातील मजेदार कोडी व खेळ विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे लक्ष वेधून घेत होते. अंतरिक्ष संदर्भात शनीची कडी गायब का होतात? तसेच चंद्राची रोजची बदलणारी स्थिती इ. विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्तमप्रकारे माहिती सादर केली.

अलिबाग शहराचा नकाशाही प्रदर्शनात मांडण्यात आला होता. अलिबाग शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची, त्यांच्या प्रतिकृती व तक्त्यांच्या आधारे माहिती देण्यात आली.

शाळेने भरविलेल्या या प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.