खारघरमध्ये निर्भया पथकाच्या वाहनाचा गैरवापर; तरुणाविरोधात गुन्हा दाखल


नवी मुंबई (प्रतिनिधी) : महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निर्भया पथकाच्या सरकारी वाहनाचा गैरवापर झाल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील खारघर येथे घडली आहे. मध्यरात्री बेलपाडा परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित तरुणाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास बेलपाडा येथील एका चौकात निर्भया पथकाच्या पोलीस वाहनातून विना गणवेश एक युवक उतरल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी त्याला जाब विचारला. यावेळी त्याने अरेरावी करत स्वतःला पोलिसांशी संबंधित असल्याचे सांगितले आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. किरकोळ धक्काबुक्की झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी धाडस दाखवत संबंधित युवकाला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांनी घेतली. चौकशीत संबंधित युवक हा खारघर पोलीस ठाण्यात स्वच्छतेचे काम करणारा कर्मचारी असल्याचे समोर आले. राम नंदू पवार (वय २१) असे त्याचे नाव असून, तो वारंवार ठाण्यात येत असल्याने वाहन उभे करण्याची जागा व किल्ली ठेवण्याचे ठिकाण याची त्याला माहिती होती, अशी प्राथमिक माहिती आहे.
राम पवार याच्याविरोधात सरकारी वाहनाचा अपहार, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणे तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे आदी गुन्ह्यांखाली खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित वाहन पोलिसांच्या ताब्यात होते की ठाण्याच्या आवारातूनच ते घेण्यात आले, याबाबत पुढील तपास सुरू आहे.