अलिबागमध्ये पिकअप टेम्पो पलटी; एकाचा मृत्यू, २२ कामगार जखमी


अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग तालुक्यातील रामराज–भिलजी मार्गावर बोरघर पुलाजवळ पिकअप टेम्पो पलटी झाल्याने एकाचा मृत्यू तर सुमारे २२ कामगार जखमी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल कंपनीतील काही कामगार पिकअप टेम्पोमधून रामराज येथे नमाज अदा करण्यासाठी जात होते. दुपारी सुमारे १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान बोरघर पुलाजवळ पोहोचताच वाहन अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्यावर पलटी झाले. या अपघातात वाहनातील प्रवासी कामगार गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
माहीती साठी