अलिबाग (विशेष प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेच्या आगामी अर्थसंकल्पाचा आराखडा तयार करण्यावरून आज जिल्हा परिषद परिसरात मोठा राजकीय हायड्रामा पाहायला मिळाला. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील कुरघोडी, प्रशासनावर टाकलेला दबाव आणि शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले. या सर्व घडामोडींमुळे जिल्हा परिषदेत निधीच्या वाटपावरून राजकीय साठमारी सुरू असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. अर्थसंकल्प २७ मार्च रोजीच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे. मात्र ताे सादर होण्यापूर्वी लीक झाल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. १६० कोटीचा अर्थसंकल्प असल्याची माहीती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे असंवैधानिक असलेल्या राजकीय पदाधिकारयांनी बैठक घेउन अर्थसंकल्प तयार केल्याची माहीती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.






