अलिबाग(प्रतिनिधी): गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आधुनिक सुविधांचा शुभारंभ अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सार्वजनिक व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील युवकांना आरोग्यदायी जीवनशैलीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
ग्रुप ग्रामपंचायत मापगांव आणि आर.सी.एफ. थळ यांच्या सीएसआर निधीतून तसेच सुनील थळे यांच्या विशेष आर्थिक सहकार्याने ही व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेल्या या व्यायामशाळेमुळे परिसरातील युवकांना आता दर्जेदार व्यायामाची सुविधा आपल्या गावातच मिळणार आहे.
या व्यायामशाळेचे उद्घाटन आर.सी.एफ. थळचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहाप्रबंधक प्रशांत पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, उपाध्यक्ष सुनील थळे, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र ठाकूर, राष्ट्रीय पर्यावरण समितीचे उपाध्यक्ष मनोहर म्हात्रे तसेच युवा नेते सुचित थळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनानंतर मान्यवरांनी आपल्या मनोगतातून युवकांना नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून देत आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. “शारीरिक तंदुरुस्ती ही यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. ग्रामीण भागात अशा सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमामुळे बहिरोळे व परिसरातील युवकांना शहरांमध्ये जावे लागणार नाही, तसेच त्यांचा वेळ आणि खर्चही वाचणार आहे. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामविकासाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले.




