पुढील काळात प्रत्येक तालुक्यात प्रदर्शनासाठी प्रयत्न – ना. अदिती तटकरे


मिनी सरस व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उद्घाटन
अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात प्रथमच सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याबद्दल जिल्हा परिषदेचे अभिनंदन करते. हे प्रदर्शन केवळ विक्रीसाठी नाही. तर केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ची माहितीही देण्यात येणार आहे. यावर्षी २५ लाख महिला लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बचतगटांचा उत्साह पाहून आनंद झाला. पुढील काळात बचतगटांना एवढे सक्षम करण्यासाठी काम करूया की प्रत्येक तालुक्यात असे प्रदर्शन भरतील, असे आवाहन महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिला स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मिनी सरस प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता.२०) करण्यात आले. त्यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या.
यावेळी राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, गटनेते वैकुंठ पाटील,  संतोष बैलमारे, उपमुख्य कार्यकारी  पक्षप्रतोद अमित नाईक, जि. प. सदस्य अभिषेक विचारे, प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा अधिकारी (सामान्य प्रशासन) जालिंदर पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राहुल कदम, कार्यकारी अभियंता विनायक तेलंग, महिला व बालकल्याण समिती अधिकारी निर्मला कुचिक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, जि. प. सदस्य व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण काम सुरू आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद अर्थसंकल्पात महिला बचतगटासाठी मोठी तरतूद केली जाईल.
उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या महिलांसाठी राबविलेल्या योजनांमुळे, सहाय्यामुळे महिला बचतगटांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मदत होत आहे. पुढील वाटचालीसाठी जिल्हा परिषदेचे सहकार्य असणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रास्ताविकामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी, जिल्ह्यात १९,५६५ महिला स्वयंसहाय्यता गट असून फिरते कर्ज, बँकेकडून कर्ज उपलब्ध करून २ कोटी ८९ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच उमेद अंतर्गत अँपवर १०० बचतगटांची नोंदणी करण्यात आली आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
गटनेते वैकुंठ पाटील, संतोष बैलमारे यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी केले.
या प्रदर्शनात रायगड जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी बनवलेली दर्जेदार नाविन्यपूर्ण उत्पादने एका छताखाली मिळणार आहेत. यासोबतच २४ मार्चपर्यंत विविध खाद्यपदार्थ व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना मिळणार आहे.