रायगड जिल्ह्यात ईद-उल-फितर उत्साहात; जामा मशिदीत नमाज अदा


अलिबाग(प्रतिनिधी): पवित्र रमजान महिन्यानंतर साजऱ्या होणाऱ्या ईद-उल-फितरचा सण अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील जामा मशिदीत सकाळी विशेष नमाज अदा करण्यात आली.
मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नमाज पठण केले आणि एकमेकांना “ईद मुबारक”च्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या वेळी अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सहकाऱ्यांसह उपस्थित राहून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच शांतता राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्ह्यातील 236 मशिदी, 28 दर्गे, 19 मदरसे आणि 3 इतर ठिकाणी नमाज अदा करण्यात आली. सुमारे 50 ते 60 हजार नागरिक सहभागी झाले होते. बंदोबस्तासाठी 87 पोलीस अधिकारी, 569 कर्मचारी, 3 RCP पथके, 12 स्ट्रायकिंग फोर्स आणि 59 वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
नमाजानंतर नागरिकांनी एकमेकांना भेटून बंधुता आणि एकात्मतेचा संदेश दिला.