थकीत वीज देयक वसुली पथकावर हल्ला; दोघांविरोधात गुन्हा


अलिबाग (प्रतिनिधी) : थकीत वीज देयकांच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर मारहाण झाल्याची घटना मांडवी मोहल्ला परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणकडून राज्यभरात थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत अलिबाग परिमंडळाचे १२ जणांचे पथक बुधवारी संबंधित परिसरात गेले होते. अख्ततारी जैनुद्दीन चौधरी यांचे सुमारे ६८ हजार २८० रुपयांचे वीज बिल थकीत होते. वसुलीसाठी पथक पोहोचल्यावर मुसद्दीक जैनुद्दीन चौधरी यांनी पैसे नसल्याचे सांगत बिल भरण्यास नकार दिला.
यानंतर पथकाने नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची सूचना दिली असता, संतापलेल्या मुसद्दीक चौधरी व अरफान मुनवर चौधरी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर मारहाण केली व शिवीगाळ केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार, लोकसेवकांना कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, मारहाण व शिवीगाळ यांसंदर्भात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भुंडेरे पुढील तपास करत आहेत.