कै. पूर्वा भगत स्मृती चषक कबड्डी स्पर्धेत मरिआई धेरंड, कर्नाळा स्पोर्टस् विजेते


अलिबाग (प्रतिनिधी) : ॐकार क्रीडा मंडळ, वेश्वी यांच्या वतीने आयोजित कै. पूर्वा भगत स्मृती चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत पुरुष गटात मरिआई धेरंड संघाने, तर महिला गटात कर्नाळा स्पोर्टस्, पनवेल संघाने विजेतेपद पटकावले.
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वेश्वी येथील जिल्हा परिषद शाळेच्या क्रीडांगणावर दोन दिवस ही स्पर्धा खेळविण्यात आली. पहिल्या दिवशी पुरुष गटातील सामने पार पडले. अंतिम फेरीत मरिआई धेरंड संघाने उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद मिळवले, तर जय हनुमान धेरंड संघ उपविजेता ठरला. वादळ खारीकवाडा संघाने तृतीय, तर गावदेवी आंदोशी संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ऋत्विक पाटील याचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट चढाईसाठी स्मित म्हात्रे, तर उत्कृष्ट पकडीसाठी ओमकार मेस्त्री यांना पारितोषिक देण्यात आले. रोहित शेळके याची ‘पब्लिक हिरो’ म्हणून निवड झाली.
दुसऱ्या दिवशी महिलांच्या गटातील सामने रंगले. कर्नाळा स्पोर्टस्, पनवेल संघाने विजेतेपद मिळवले, तर पनवेल स्पोर्ट्स संघ उपविजेता ठरला. भिल्लेश्वर किहीम संघाने तृतीय, तर ऋतिक्षा स्पोर्ट्स, पेण संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तेजा सकपाळ हिची निवड झाली. उत्कृष्ट चढाईसाठी चैताली म्हात्रे, तर उत्कृष्ट पकडीसाठी पायल निगडे हिला गौरविण्यात आले. मल्लिका शिंदे ‘पब्लिक हिरो’ ठरली.
स्पर्धेचे उद्घाटन चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. विजेत्या संघांना ॐकार क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच रायगड जिल्हा संघातील खेळाडू, प्रशिक्षक व पंच यांचा सत्कार करण्यात आला.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ॐकार क्रीडा मंडळ, वेश्वीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.