मुरुड (प्रतिनिधी): मुरुड येथे मुरुड जंजिरा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने “स्पोर्ट्स ऑफ युनिटी” आयपीएल फॉरमॅट नाईट भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित सदस्य मा. श्री. अमितदादा नाईक यांनी विशेष उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
यावेळी मुरुड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. श्री. विजू काका पैर, मुरुड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक तमिम धाकम, शिवसेना (उबाठा) गटाचे नगरसेवक मा. रूपेश पाटील, तसेच इम्तियास जमादार, विनायक धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दादांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अमितदादा नाईक यांच्या हस्ते सामन्याचा टॉस पार पडला. त्यांच्या उपस्थितीमुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी आपल्या मनोगतात क्रीडा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित करत युवकांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
अशा क्रीडा स्पर्धांमुळे युवकांना योग्य दिशा मिळते, संघभावना वृद्धिंगत होते आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता राज्यस्तरावर सिद्ध करण्याची संधी प्राप्त होते. त्यामुळे या स्पर्धेला स्थानिक नागरिक आणि क्रिकेटप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला.





