अलिबाग (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अलिबाग शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी अंबेकर चौकात जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी आंबेडकरांच्या विचारांचा समाजाने अवलंब करून समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला अलिबाग नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, भाजपच्या सरचिटणीस प्रिती पाटील तसेच नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मिळून डॉ. आंबेडकरांच्या कार्याला आदरांजली वाहत त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान परिसरात सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचे वातावरण पाहायला मिळाले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभिवादन सोहळ्यात सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांची जाणीव ठेवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.






