महिलांना निर्णयप्रक्रियेतील ‘शिल्पकार’ होण्याची संधी – ॲड. मनस्वी मोहिते


अलिबाग (प्रतिनिधी) : देशातील महिलांना आतापर्यंत विविध धोरणात्मक निर्णयांचे केवळ लाभार्थी म्हणून पाहिले जात होते. मात्र, लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाल्यानंतर महिलांना थेट निर्णयप्रक्रियेत सहभागी होऊन धोरणांचे ‘शिल्पकार’ होण्याची ऐतिहासिक संधी मिळणार असल्याचे मत भाजप महिला आघाडीच्या दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्षा ॲड. मनस्वी मोहिते यांनी व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या की, महिलांना राजकारण, प्रशासन आणि समाजकारणात समान संधी मिळाल्यास देशाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल. महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण असून यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल.
ॲड. मोहिते यांनी नमूद केले की, महिलांच्या सहभागामुळे निर्णयप्रक्रिया अधिक संवेदनशील, समतोल आणि सर्वसमावेशक होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणामुळे महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे, त्याचप्रमाणे आता राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरही महिला प्रभावी नेतृत्व करताना दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या निर्णयामुळे देशातील महिला वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात अधिकाधिक महिला राजकारणात पुढे येतील, असेही त्यांनी सांगितले.