अलिबाग (प्रतिनिधी) : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सध्या युद्धपातळीवर सुरू असून ठेकेदार कंपनीकडून एकाच वेळी चार इमारतींची कामे वेगाने सुरू आहेत. महाविद्यालयाच्या उभारणीमुळे परिसरातील आरोग्य सेवेला मोठा हातभार लागणार असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
महाविद्यालयाच्या मुख्य शैक्षणिक इमारतीसह वसतिगृह, रुग्णालयीन सुविधा आणि प्रशासकीय इमारतींचे काम एकाच वेळी हाती घेण्यात आले आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू असल्याने पुढील दोन वर्षांत हे महाविद्यालय पूर्णत्वास येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, यंदा एमबीबीएसची पहिली बॅच या महाविद्यालयातून बाहेर पडणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांनी दिली. “बांधकामाची गती कायम ठेवून सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,” असे त्या म्हणाल्या.
महाविद्यालय पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून वैद्यकीय शिक्षणासाठीही नवे दालन खुले होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.






